मी पाहिलेला रायगड व शिवराज्याभिषेक सोहळा
दिनांक 6 जून 2016 रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सर्वप्रथम रायगडावर जाण्याचा योग आला त्याकरिता पाच जून रोजी कुटुंबासह औरंगाबाद हुन पुणे मुळशी माणगाव महाड मार्गे रायगड किल्ला येथे पोहोचलो. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल रायगड पॅलेस या ठिकाणी मुक्कामी थांबलो. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सकाळी लवकर आटपून रायगडावर जाण्यासाठी निघालो गडावर जाण्यासाठी रोप वे व पायऱ्या असे दोन पर्याय आहेत परंतु आम्ही पायऱ्यांनी जाण्याचा पर्याय निवडला. पायर्यांच्या सुरुवातीलाच मोठ्या अक्षरातील किल्ले रायगड असा बोर्ड वाचला आणि खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाल्याचा भाव मनात प्रकट झाला मनाला लागलेली हुरहुर काहीअंशी शांत झाली तरी वर जाण्याची मनाची तीव्रता मात्र कायम होती. त्यानंतर आम्ही सर्वजण हिरकणी बुरुज मुख्यदरवाजा हत्ती तलाव टकमक टोक गंगासागर तलाव असे अवर्णनीय ठिकाणे पाहून मनात आणि डोळ्यात साठवून पालखी दरवाजाने किल्ले रायगडावर पोहोचलो. आणि गर्दीतून हळूहळू मार्गक्रमण करत शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचलो.
सिंहासनाकडे जाताना महाराज ज्या पायऱ्या चढून जात असत त्या पायरीवर नतमस्तक झालो आणि समाधानाने भरून पावलो आणि दुसरीकडे डोळ्याच्या कडा पाणावल्या आणि रायगडा सारख्या पवित्र ठिकाणी येण्यासाठी आपल्याला इतका उशीर झाला याची खंत आणि दुःख मनात घर करून गेले. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले आणि माननीय खासदार उदयनराजे भोसले स्वतः हजर होते थोड्यावेळापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष माननीय संभाजी राजे भोसले यांचे हस्ते सनई चौघडे व मावळ्यांच्या जोशपूर्ण घोषणांत छत्रपती शिवरायांचा अभिषेक पार पडला होता. महाराजांचा जयजयकार आणि जिकडे-तिकडे भगव्या पताका यांनी रायगडचा सर्व परिसर दुमदुमून गेला होता..
छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे दर्शन घेऊन मग नगारखान्यातून आम्ही होळीच्या मैदानाकडे गेलो. ढोल-ताशांच्या गजरात महाराजांच्या जयजयकाराने सह्याद्री आणि आकाश दुमदुमून गेले होते होळी मैदानावर तलवार दांडपट्टा व इतर शिवकालीन शस्त्रे यांच्या चित्तथरारक कवायती सुरू होत्या. त्या कवायती इतिहासात घेऊन जाणाऱ्या आणि डोळ्याचे पारणे फेडणार्या होत्या.
त्यानंतर राजसदर ते जगदीश्वर मंदिर अशी महाराजांची भव्यदिव्य अशी नेत्रदीपक मिरवणूक काढण्यात आली होती. रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जल्लोष पाहून आकाशालाही हेवा वाटत होता आणि सह्याद्री सुद्धा रायगडाकडे पाहून आनंद व्यक्त करीत होता. आणि या अतिपवित्र क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हास लाभले होते. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ठिकाण मेघडंबरी सिंहासन राजसदर ही हार फुलांनी सजले होते तर जीकडे तिकडे भगवे झेंडे लक्ष वेधून घेत होते.शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तसेच इतिहासातील अनेक विजय घटनांचा साक्षीदार असलेला रायगड पाहून मन भारावून गेले होते आणि स्वराज्य निर्मितीत झालेल्या पराक्रमांनी छाती अभिमानाने फुलून गेली होती. जिकडेतिकडे छत्रपती शिवरायांच्या नावाचा जय जय कार अंगावर शहारे आणत होता त्यानंतर बाजारपेठेतून आम्ही टकमक टोक जगदीश्वर मंदिर आणि समाधीस्थळी नतमस्तक होऊन परत राजसदरकडे म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ठिकाणी आलो एव्हाना सुर्य मावळतीकडे निघाला होता परंतु दिमाखदार अशा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम मात्र जल्लोषात सुरू होता. आम्ही पायर्या चढून वर आल्यामुळे दुर्गदुर्गेश्वर रायगडाची भव्यता आणि दिव्यता लक्षात आली होती भव्य असा रायगड पाहून मन हरखून गेले होते या सम हाच ही भावना मनात निर्माण झाली होती
शिवराज्याभिषेक सोहळ्याचा अवर्णनीय असा कार्यक्रम मावळ्यांच्या आवेश. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात घुमणारा महाराजांचा जयजयकार यामुळे तहान-भूक विसरून कार्यक्रमात रममाण झालो होतो अंगावर चैतन्य आणि स्फूर्ती आणणारा हा सोहळा पाहून डोळ्याचे पारणे फिटले. आणि प्रत्यक्ष सहा जून १६७४ रोजी झालेला शिवराज्याभिषेक सोहळा कसा अवर्णनीय आणि न भूतो न भविष्यती असेल या विचाराने मन हे इतिहासात डोकवायला लागलं होतं. शेवटी संध्याकाळी इच्छा नसताना मनाच्या विरुद्ध जड पावलांनी आम्ही हळूहळू खाली उतरू लागलो रायगडाच्या पायथ्याशी पहिल्या पायरीवर येऊन परत नतमस्तक होऊन सर्वजण गाडीकडे निघालो आणि मनाच्या विरुद्ध रायगड सोडले परंतु डोळे मात्र पुन्हापुन्हा रायगडाकडे पाहत होते इतका भव्यदिव्य आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड पाहण्याचे भाग्य लाभले होते याचा मनस्वी खूप आनंद झाला होता. बेलाग अजिंक्य असा रायगड पाहून मन तृप्त होऊन गेले. पाचाड गावाच्या पुढे शेवटच्या वळणावर जाऊन परत थांबून पुन्हा सर्वजण गाडी खाली उतरलो आणि पुन्हा एकदा रायगडाला नमन करून परतीच्या प्रवासाला निघालो होतो परंतु शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नेत्रदिपक अशा आठवणी मनात डोळ्यात पाणी हृदयात साठवून........


Raje chhatrapatin na manacha mujra 🙏🙏
ReplyDeleteUtkrushta mandals 🔥🔥✨👌
अंगावर शहारे होते फक्त.......वाचुन कधी इतिहासातच पोहोचल्यासारख वाटलं ध्यानातच नाही आलं
ReplyDelete